जुन्नर तालुका हा प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत सुमारे ५०० वर्षांच्या कालखंडात ही लेणी कोरण्यात आली. व्यापारी मार्गांवरून जाणाऱ्या बौद्ध भिक्खू, व्यापारी व प्रवाशांसाठी या लेण्यांची निर्मिती करण्यात आली होती.

तुळजा लेणी, मानमोडी डोंगर (भूतलेणी, अंबा-अंबिका लेणी), शिवनेरी डोंगरावरील ६० हून अधिक लेणी आणि लेण्याद्री येथील ३० लेणी अशा चार प्रमुख समूहात ही लेणी विस्तारलेली आहेत. चैत्यगृहे, विहार, स्तूपांची रचना आणि दगडात कोरलेली जलव्यवस्था जुन्नरच्या समृद्ध प्राचीन संस्कृतीची साक्ष देतात.